नमस्कार . महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातील एक नामवंत जुनी शिक्षण संस्था आहे . या संस्थेच्या अनेक शाळांपैकी म ए सो भावे प्राथमिक शाळा ही पुण्यातील सदाशिव पेठेतील शाळा आहे . म ए सो भावे प्राथमिक शाळा ही गेली 127 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे या शाळेचे अनेक विद्यार्थी देश व जागतिक पातळीवर नाव लौकिक मिळवलेले आहेत. उत्तम शिक्षकांचा वारसा लाभलेल्या या शाळेने आत्तापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवलेला आहे. स्व. कमलाताई गाडगीळ, स्व. लता सांगळे, स्व. मंगल आपटे, स्व. शैलजा लिमये या उत्तमोत्तम शिक्षकांच्या परंपरेत आजही अनेक गुणवंत शिक्षक शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे .
इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत शाळेने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केलेले आहेत . स्कॉलरशिप मध्ये गुणवत्ता यादीत शाळा नेहमी अग्रेसर असायची .आजही शाळेच्या व्हरांड्यात अशा गुणवंत स्कॉलर मुलांच्या विद्यार्थ्यांची यादी पहावयास मिळते .भावे प्राथमिक शाळेत पूर्वीप्रमाणेच सर्व सण, उत्सव तसेच परिपाठ ,बालसभा ,वर्ग मंत्रिमंडळ, असे अनेक उपक्रम चालू आहेत. गणपती उत्सव ,दहीहंडी, शिवजयंती, नवरात्र ,क्रीडा महोत्सव , क्रांती सप्ताह असे उपक्रम शाळेत मोठ्या उत्साहाने संपन्न होतात . वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे डिसेंबर महिना ! खेळ ,कला, नृत्य इत्यादींची धमाल असते. या वर्षी (2022-23)शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभागी केले होते. याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठराविक विद्यार्थ्यांसाठीच न राहता सर्व मुलांना याचा
खऱ्या अर्थाने आनंद घेता आला .शाळेत बाह्य स्पर्धांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते. वक्तृत्व ,गायन , ॲथलेटिक्स ,कथाकथन ,सांघिक खेळ इत्यादीसाठी तयारी करून घेतली जाते.
बाह्य स्पर्धा परीक्षेची तयारी करून विद्यार्थ्यांना या परीक्षांना बसविले जाते, महाराष्ट्र ज्ञानपीठ, मुंबई ची गणित व इंग्रजी स्पर्धा परीक्षा, भारती विद्यापीठाची गणित परिचय परीक्षा , ज्ञानांजन परीक्षा ,ज्ञानवर्धिनी परीक्षा , एम टी एस परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते . शाळेतील वातावरण पर्यावरण पूरक आहे .भरपूर मोठे अंगण सभागृह ,जुनी दगडी इमारत ,स्वच्छ व सुंदर परिसर ,भरपूर झाडी ,त्यामुळे शालेय वातावरण शैक्षणिक दृष्ट्या अगदी योग्य बनले आहे .वर्षानुवर्षे मुलांनी केलेल्या स्तोत्र पठणामुळे शाळेतील एकूणच परिसर चैतन्यदायी वाटतो.
संस्थेने शाळेच्या विकासासाठी खूप मोलाची मदत केलेली आहे .उत्तम व्यवस्थापन आहे .शाळा समिती अध्यक्ष मा सौ आनंदी पाटील यांचे नेहमी बहुमोल मार्गदर्शन लाभते. तसेच शाळेच्या महामात्रा मा.प्रा.चित्रा नगरकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन सतत शाळेला मिळत आहे . म ए सोसायटीच्या सर्व सदस्यांनी शाळेला प्रगतीपथावर येण्यासाठी , सातत्याने नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत व सहकार्य केलेले आहे .याप्रसंगी मी त्यांचे आभार मानते . शाळेच्या वेबसाईटमुळे माजी शिक्षक, माजी विद्यार्थी व समाजातील सर्व वर्गातील लोकांना शाळेची माहिती तर मिळेलच, त्याचबरोबर सध्या शाळेत होणारे सर्व उपक्रम ,कार्यक्रम प्रगती पाहता येईल सर्व हितचिंतकांचे पुन्हा एकदा आभार मानते.
आपली विश्वासू
सौ.प्रतिभा गायकवाड
मुख्याध्यापक