विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सणसमारंभ शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा.त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा, आत्मविश्वास वाढावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी . विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीही जोपासली जावी.ही शाळेची उद्दिष्टे असल्याने भावे प्राथमिक शाळेमध्ये विविध सण - समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
म. ए . सो. भावे प्राथमिक शाळेत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन केले .सर्व विद्यार्थी व शिक्षक विठ्ठलाच्या आरतीत उत्साहाने सहभागी झाले .शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याचे महत्त्व समजावून सांगितले .विद्यार्थ्यांनी यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या गोष्टीचे नाट्यीकरण करून दाखवले .
शाळेतील विद्यार्थी विठ्ठल - रुक्मिणी यांची वेशभूषा करून आले होते .तर काही विद्यार्थी संत रामदास , संत तुकाराम ,संत ज्ञानेश्वर , संत बहिणाबाई ,संत सोपानदेव या थोर संतांची वेशभूषा करून आले होते .त्यांनी या संतांचे कार्य थोडक्यात सांगितले . सर्व विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून आले होते .'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ' , 'ग्यानबा तुकाराम' असा जय घोष करत चिमुकल्या वारकऱ्यांनी पालखी सोहळ्याचा आनंद घेतला .
पालखी सोहळ्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी अभंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी यावेळी चंद्रभागेच्या तिरी , विठ्ठल नामाची शाळा भरली , अबीर गुलाल उधळीत रंग , खेळ मांडीयेला इत्यादी अभंगांचे गायन केले .आपल्या भूमीतील थोर संतांची व त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा यामागचा उद्देश होता .याच दिवशी विद्यार्थ्यांची 'फॅन्सी ड्रेस 'स्पर्धा घेण्यात आली .आकर्षक वेशभूषा करून विद्यार्थी या स्पर्धेत उत्साहाने सहभागी झाले . माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमाला सर्व शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
शुक्रवार दि . २१ जून रोजी म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला . शाळेत रोज विद्यार्थ्यांचा सूर्यनमस्कार घालण्याचा सराव घेण्यात आला होता . या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व सांगितले व रोज सूर्यनमस्कार घालण्यास सांगितले .विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घेण्यात आल्या . इ . पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले . विद्यार्थ्यांनी ताडासन , वृक्षासन , अर्धचक्रासन ,भुजंगासन , पद्मासन इ . आसने करुन दाखविली . मनोरे सादर केले .
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालण्याचा व योगासने करण्याचा संकल्प केला . शांतिपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ दि .१५ जून २०२४ रोजी सुरु होणार आहे . नवागतांच्या स्वागतासाठी म .ए .सो . भावे प्राथमिक शाळा सज्ज झाली आहे .
विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा यासाठी शाळेत आकर्षक सजावट करण्यात आली आहे . शाळेची इमारत फुलांच्या माळांनी व रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आली आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान लावून त्यावर फुलांची सजावट करण्यात आली आहे . शाळेच्या इमारती समोर शाळेत जाणारे विद्यार्थी रांगोळीतून रेखाटले आहेत . या रांगोळीतून नियमित शाळेत येण्याचा विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे . विद्यार्थ्यांना सेल्फीचा आनंद घेता यावा यासाठी खास डोरेमॉनची प्रतिकृती असणारा सेल्फी पॉईंटही तयार करण्यात आला आहे .
विद्यार्थ्यांच्या औक्षणाची तयारी करण्यात आली आहे . शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पपेट शो दाखवण्यात येणार आहे . विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्सुक आहेत . माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले .
नवीन शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ मध्ये म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेत दि . १५ जून २०२४ रोजी उत्साहात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .इयत्ता दुसरीतील विद्यार्थी स्पायडरमॅन , परी , बार्बी ,मोर ,ससा आणि माकड यांची वेशभूषा करून आले होते . वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीतील मुलांचे स्वागत केले .शाळेची इमारत फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती . प्रवेशद्वारावरील आकर्षक कमानीवर फुलांची व फुग्यांची सजावट करण्यात आली होती . वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले . विद्यार्थ्यांना भेटकार्ड देण्यात आले . शाळेच्या इमारती समोर शाळेत जाणारे विद्यार्थी रांगोळीतून रेखाटले होते .या रांगोळीतून नियमित शाळेत येण्याचा विद्यार्थ्यांना संदेश दिला होता .
विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी खास पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते . या पपेट शो मधून विद्यार्थ्यांना आरोग्याच्या व वर्तनविषयक चांगल्या सवयी सांगण्यात आल्या व त्याप्रमाणे वागण्याचा संदेश दिला . या दिवसाचे खास आकर्षण ठरले डोरेमॉनची प्रतिकृती असणारा सेल्फी पॉईंट .या सेल्फी पॉईंट वर पालकांनी व विद्यार्थ्यांनी सेल्फीचा आनंद घेतला .
विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले व खाऊही देण्यात आला .माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
शाळेतील इयत्ता १ ली कमळ गटाने गुरुवार दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी परिपाठ सादर केला. या परिपाठामध्ये सर्व मुलांनी सहभाग घेतला होता.सर्व मुलांचे पाठांतर छान झाले होते व मुलांचे सादरीकरण पण खूपच छान झाले. परिपाठातील वैशिष्ट्ये म्हणजे खेळातील एका साहित्यांचा म्हणजेच " लॅडर " याचा उपयोग कसा करायचा हे मुलांनी प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. परिपाठाचा शेवट सुंदर अशा गाण्याने म्हणजेच "आनंदाचे गाणे " म्हणून केला.
माननीय मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार बाईनी मुलांनी सादर केलेल्या परिपाठाचे कौतुक केले . वर्गशिक्षक सौ अमृता पवार यांना व विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिली.
म. ए .सो. भावे प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य सांगितले व शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले . इ .१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या गोष्टी सांगितल्या .सावित्रीबाई फुले यांचे चित्र काढले व त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती लिहिली .विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती .
माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
इ.४थी आदित्य गटाने या स्पर्धेत लिंगाणा हा किल्ला बनविला व प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
लिंगाणा किल्ला
लिंगाणा किल्ला म्हणजे...सह्याद्रीचे शिवलिंग! स्वराज्याचे कारागृह!! ट्रेकर्सच्या दृष्टीने अतिशय अवघडअसणारा अभेद्य किल्ला!!! महाराष्ट्रातील कठीण किल्ल्याच्या यादीत प्रमुख स्थान पटकावणारा किल्ला!! मोर्यांचा पराभव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रायगड जवळ हा किल्ला बांधला. या किल्ल्याची उंची ३१०० फूट आहे. स्वराज्याच्या शत्रूंना इथे कैदेत ठेवत असत.अतिशय अवघड,वाट नसलेला सुळका आणि घसरड्या वाटा यामुळे कैदी खचून जात व पळण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना आपला जीव गमवावा लागे. मोहरी गाव,बोराट्याची नाळ,रायलिंग पठार,पठाराच्या पोटात असणारी गुहा ,गुहेला लागून असणारे धान्याचे कोठार आणि गुहेवरुन पुढे गेल्यावर असणारा पाण्याचा हौद ही येथील पहाण्यासारखी स्थळे!
महाराष्ट्र रेंजर्स मधील गिर्यारोहक तानाजी केंकरे यांनी अवघ्या ११मि. २२सेकंदात हा सुळका सर करण्याचा विक्रम केला आहे. असा हा अभेद्य आणि अवघड,स्वराज्याचे कारागृह असणारा किल्ला.....किल्ले लिंगाणा!!! किल्ला बनवण्यासाठी मुलांना मार्गदर्शन केले होते वर्गशिक्षिका रेणुका महाजन व स्वाती रावस यांनी !!
इयत्ता तिसरी अनुराधा गटाकडे स्वराज्यातील सर्वात महत्त्वाची जागा घेऊन उभा असलेला राकट गड मंगळगड तयार करण्याची जबाबदारी आली. मुलांनी अतिशय मेहनतीने व उत्साहाने अभ्यासपूर्ण हा किल्ला तयार केला व या त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आमच्या वर्गाचा किल्ले स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. त्यासाठी माननीय मुख्याध्यापिका व उपमुख्याध्यापिका यांचे
खूप खूप आभार.
किल्ले मंगळगड
मंगळगड किल्ला हा जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी बांधला १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेल्या सात किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. याचे पहिले नाव कांगोरीगड असे होते. कांगोरी गड चंद्रराव मोरे यांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला त्याचा उपयोग घाट मार्गाच्या संरक्षणासाठी व टेहळणीसाठी केला गेला.१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर कांगोरी गड, ढवळगड,रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजी सारखा कसलेल्या योद्धा मिळाला कांगोरी गडाची डागडुजी करून त्याचे नाव बदलून मंगळगड असे ठेवण्यात आले. स्वराज्याची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने जुल्फीकरखानास रायगड घेण्यास सांगितले.
गडावर सिद्धेश्वराचे मंदिर आहे तसेच विस्तीर्ण असे पठार आहे. कांगोरी देवीचे देखील मंदिर आहे. हा किल्ला गिर्यारोहकांचे आवडते स्थळ आहे. अशा या मंगळगड तयार करण्यासाठी सौ.दिपाली कुलकर्णी व सौ.करुणा वानखेडे यांनी मार्गदर्शन केले होते.
इयत्ता तिसरी स्वाती गटातील विद्यार्थ्यांनी किल्ला बनवणे स्पर्धेसाठी विश्रामगड उर्फ पट्टाकिल्ला हा किल्ला बनवला आणि सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की या स्पर्धेमध्ये या किल्ल्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांनी
स्वतः मेहनत करून हा किल्ला बनवला.
विश्रामगड किल्ला उर्फ पट्टाकिल्ला?
या किल्ल्याची माहिती थोडक्यात खालील प्रमाणे:-
- गडाचे नाव -पट्टाकिल्ला उर्फ विश्रामगड
- स्थान- अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर अकोला तालुक्यात पट्टेवाडी गावाजवळ ? उंची-समुद्रसपाटीपासून 882 मीटर
- गडाचा प्रकार -गिरीदुर्ग
- जवळचे गाव- तरडे ,पट्टेवाडी
- गडावर पाहण्याची ठिकाणे- अंबरखाना, पाण्याची तळी, त्र्यंबक दरवाजा, धान्य कोठार ,लक्ष्मणगिरी महाराजांची गुहा आणि अष्टभुजा देवीचे मंदिर.
- गडाचा इतिहास- या गडाचे बांधकाम बहामनी सलतनीच्या काळात इसवी सन 1490 साली झाले. इसवी सन 1671 मध्ये हा किल्ला महाराजांचे सरदार मोरो
त्रंबक पिंगळे यांनी स्वराज्यात सामील केला. 21 नोव्हेंबर 1679 या दिवशी जालन्याची लूट करून परतत असताना महाराजांनी या किल्ल्यावर सतरा दिवस विश्राम केला म्हणून या किल्ल्याला विश्रामगड असे नाव पडले. - किल्ला बनवण्यासाठी वर्गशिक्षक -सौ. माहेश्वरी थोपटे व सौ.अमृता पवार यांनी मार्गदर्शन केले.
जवळ्या किल्ला
जवळ्या किल्ल्याची उंची 4055 फूट आहे. सातमाळा डोंगररांगेत नाशिक श्रेणीत हा किल्ला आहे. रवळ्या जवळ्या हे दोन जुळे
किल्ले आहेत. ऐतिहासिक कागदपत्रात रवळ्या जवळ्याचा उल्लेख रोला जोला म्हणून येतो. 1636 मध्ये अलवर्दीखानाने हा किल्ला जिंकून घेतला.1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला.1671मध्ये दिलेरखानाने या किल्ल्याला वेढा घातला होता.तो मराठ्यांनी उधळून लावला.त्यानंतर महाबतखानाने हे किल्ला जिंकून घेतला.पेशवेकाळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सध्या किल्ल्यावर पाण्याची टाके,समाधी व बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात.
किल्ले मंडणगड
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग. व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण. किल्ल्यावर गणेश मंदिर आहे.स्वच्छ पाण्याचा तलाव आहे समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्यावर्दी दौलतखान याची कबर आहे.
कोरीव काम केलेला दगड आहे जवळच एक तोफ ठेवलेली आहे. हा किल्ला राजा भोज याने 12व्या शतकात बांधलेला आहे.पुढे इ.स.1661 जसवंतराव दळवी याच्या ताब्यात होता. काही काळ हा किल्ला सिद्धी कडे होता स.न .1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांनी जिंकला.
त्रिंगलवाडी किल्ला
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध प्राचीन दुर्ग असलेल्या त्रिंगलवाडी किल्ला साकारला व किल्ल्याची ऐतिहासिक, भौगोलिक व किल्ल्यावरील ठिकाणांची माहिती आणि गड किल्ल्यांचे संवर्धन, रक्षण केले पाहिचे हा संदेश सादरीकरणातून सांगितला. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती दहाव्या शतकात झाली असावी. 1636 मध्ये शहाजीराजे यांनी मुघलांकडून पराभव
झाल्यावर हा किल्ला मुघलांना दिला.*शिवरायांनी हा किल्ला पुन्हा ताब्यात घेतला.
हा किल्ला कळसुबाई डोंगर रांगेतील गिरीदुर्ग प्रकारात असून त्या किल्ल्याची उंची 3238 फूट इतकी आहे.हा किल्ला उत्तर दक्षिण टेकडीवर आहे याची निर्मिती मेसा खडकांची आहे. किल्ल्यावर पांडवलेणी, आणि 29 लेण्यांचा समूह, गडावर गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती, व तसेच जुन्या पडक्या वाड्याचे अवशेष* लागतात. किल्ल्यावर भुयारी पाण्याच्या टाक्या, शंकराचे देऊळ व हनुमानाची सहा सात फूट उंच मूर्ती कोरली आहे. वर्ग शिक्षिका भाग्यश्री हिरास व व दीपा महाजन यांनी इयत्ता तिसरी रेवती गटातील विद्यार्थ्यांना किल्ला बनविण्यासाठी मार्गदर्शन केले.
मनोहरगड किल्ला
म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी पूर्वा गटातील विद्यार्थ्यांनी मनोहर किल्ल्यांची माहिती सादरीकरणातून सांगितली. मनोहरगड किल्ला महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गिरीदुर्ग किल्ला आहे . किल्ल्याची उंची ३८८०फूट व ११८३ मीटर एवढी आहे.किल्ल्यावर औदुंबराचे झाड असून झाडाखाली भैरोबाच्या मूर्तीआहेत. किल्ल्यावर एक विहीर असून त्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतात. किल्ल्यावर वाडा असून स्थानिक लोक त्याला गडाचा चाळा असे म्हणतात मनोहर गडावर शिवाजी महाराज एक महिना राहिले होते. हा किल्ला पांडवांनी बांधला आहे असे दंतकथांमध्ये सांगितले आहे.
मनोहर गडाच्या शेजारीच मनसंतोष गड आहे. मनोहर गडाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर त्या काळातील शौचालय आहेत. वर्गशिक्षिका सौ. विना शिंदे व सौ.मेघा मानकर यांनी इयत्ता तिसरी पूर्व घाटातील विद्यार्थ्यांना किल्ला बनवण्यासाठी मार्गदर्शन केले.
कलाडगड
इयत्ता चौथीभानू गटातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलाडगड तयार केला. कलाडगड हा गिरीदुर्ग आहे. कलाडगड हा मुळा नदी व मंगळगंगा या नद्यांच्या बेचक्यात उभा आहे. गडाच्या पायथ्याशी कुंड आहे. गडावर भैरोबा मंदिर आहे. ?अकोला तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात हा कलाड गड आहे. कलाडगड समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर आहे. कलाडगड हा शिवलिंगासारखा दिसतो. मुळा नदीच्या खोऱ्यावर करडी नजर ठेवणारा असा हा गिरीदुर्ग आहे.
हा गड तयार करण्यासाठी सौ. शिरोडे, सौ. अर्चना वाघ व सौ. गायत्री वाणी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. किल्ले स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी भानू गटाने तयार केलेल्या कलाडगडाला द्वितीय क्रमांक मिळाला.
किल्ला - तळागड
शाळेतील इयत्ता - चौथी, दिनकर गट विद्यार्थीनी गीत आणी माहिती यातून तळागड ची माहिती सांगितली.. हाराष्ट्रातील मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर गाव आहे. या गावापासून जवळच 15 कि.मी अंतरावर तळा गाव आहे. येथेच हा तळागड किल्ला आहे. इ. स. 1648 मध्ये महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी जे 12 किल्ले स्वतःकडे ठेवून घेतले, त्यातीलच एक किल्ला म्हणजे तळागड होय... यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व समजते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकावेळी ची वस्त्रे परिधान केली गेली होती. ती या किल्ल्यावरूनच आणली होती, असेही सांगितले जाते.या किल्ल्यावर त्या काळातील शौचालय देखील आहेत.हा किल्ला तयार करण्यासाठी तसेच माहिती सांगण्यासाठी. वर्गशिक्षिका- सौ. विद्या जगताप व सौ. निबांळकर बाई यांनी मार्गदर्शन केले.
म .ए .सो भावे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक , शिक्षक , सर्व कर्मचारी व विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन संविधान दिन साजरा केला . मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाविषयी माहिती सांगितली .सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले .
संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांनी आपल्या घरी ही संविधान दिन साजरा केला .घरासमोर रांगोळी रेखाटली व वहीत चित्रही काढले .रांगोळी व चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
भारतीय संविधानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी या हेतूने संविधान दिन साजरा करण्यात आला .माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
म . ए .सो भावे प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केले .
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जीवनकार्य सांगितले व या थोर महापुरुषांमधील गुण आत्मसात करण्याचा संदेश दिला . इ .१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या गोष्टी सांगितल्या . शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता व श्रमदानाचे महत्त्व सांगितले . विद्यार्थ्यांनी यावेळी आपले घर , वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ केला . चित्रकला स्पर्धा घेण्यात आली . विद्यार्थ्यांनी स्वच्छता या विषयावरील चित्र काढून रंगवले . स्वच्छतेची प्रतिज्ञा म्हणण्यात आली . या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा , नीटनेटकेपणा , राष्ट्रभक्ती या मूल्यांचे महत्त्व समजले . विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली .
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . या उपक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
मुलांच्या जडणघडणीमध्ये आजी - आजोबांची महत्वाची भूमिका असते .आपल्या आजी आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने भावे प्राथमिक शाळेत आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांना स्वतः तयार केलेले भेटकार्ड दिले . 'माझे आजी -आजोबा ' या विषयावर निबंध लिहून आजी - आजोबांना वाचून दाखवला .आजी -आजोबांचे चित्रही रेखाटले . विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने आजी-आजोबांच्या छायाचित्रांचा व्हिडिओ तयार केला . काही विद्यार्थ्यांनी भाषणातून आजी - आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या लाडक्या आजी-आजोबांचे कौतुक करण्यासाठी नृत्य , गायन ,नाट्यछटा इ . कलाकृती सादर केल्या .आजी - आजोबांनी ही आपल्या नातवंडांना आशीर्वाद दिला .
सोमवार दि . २८ - ८ - २०२३ रोजी भावे प्राथमिक शाळे सामाजिक बांधिलकी हा मूल्य संस्कार मुलांवर रुजविण्याच्या दृष्टीने "स्वच्छता दूत व सामाजिक दूत रक्षाबंधन" हा अभिनव उपक्रम साजरा केला गेला .या उपक्रमासाठी म.न.पा भिकारदास मारुती स्वच्छता कोठी येथीलश्री. चांदणे व त्यांचे सहकारी असे 13 स्वच्छता दूत , परिसरातील विविध क्षेत्रातील काम करणारे सामाजिक दूत ,शाळेतील वॉचमन व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.इ.१लीते४थीच्या
विद्यार्थिनींनी औक्षण करून सर्वांना राखी बांधली, तसेच शाळेने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.मा. मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता दूत व सामाजिक दूत यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश दिला. या उपक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या या कामागरांविषयी या उपक्रमामुळे आपुलकीची भावना निर्माण होण्यास दिशा मिळाली,अशा प्रकारे "स्वच्छता दूत रक्षाबंधन"हा उपक्रम उत्साहात साजरा झाला.
मंगळवार दि . २२ - ८ - २०२३
रोजी भावे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणपती तयार केले .स्ट्रोक्स (द लॅंग्वेज ऑफ कलर्स फाउंडेशन) तर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्ट्रोक्स फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शाडूची माती व पुठ्ठा अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाडू माती वापरून शाळेत फाउंडेशनतर्फे आलेल्या चेतन पानसरे, स्नेहल कुलकर्णी, गौरव कोंडे, सोहम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः गणपती तयार केले . मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना कार्यानुभव या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण पूरक संस्कृती जपण्याचा संदेश दिला. स्वतः गणपती तयार करणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळाला ,अशा प्रकारे इको फ्रेंडली गणपती बनविणे हा उपक्रम उत्साहात साजरा झाला .
माहे जून मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांच्या स्वागतासाठी शाळेची फुलांच्या माळा, पताका, फुगे लावून सुंदर सजावट करुन सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पेढा देऊन स्वागत करण्यात येते.
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपूजनाबरोबरच विद्यार्थ्यांनी *मातृ पूजन* देखील केले जाते. याप्रसंगी मुलांनी आईला औक्षण करुन स्वतः बनवलेले भेट कार्ड देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या दिव्यांचे पूजन करण्यात आले यावेळी विविध प्रकारचे दिवे (कंदिल,लामणदिवा,चिमणी इ.) मांडले. त्यांची माहिती, उपयोग सांगून वर्गावर्गांतून पूजा मांडून विद्यार्थी मनोभावे दीपपूजन करतात.
वर्गावर्गांतून विद्यार्थ्यांनी मातीचे नाग-वारूळ बनवून घेतले जाते. ज्वारीच्या लाह्या, गुळ, शेंगदाणे, फुटाणे असा प्रसाद आणला नागोबाची पूजा मांडून मनोभावे पूजा केलीजाते.मातीचा नाग तयार करून स्वनिर्मितीचा आनंद मुलांना मिळतो.
थोर महापुरुषांचे विचार, त्यांचे गुण अंगी बाणावेत म्हणून त्यांच्या कार्याची माहिती सांगून प्रतिमा पूजन केले जाते.जसे टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती, सावित्रीबाई फुले जयंती इ.
शाळेत तसेच वर्गावर्गांतून जिवती जिवंतिका पूजन करून श्रावणी शुक्रवार साजरा करण्यात येतो पारंपारिक सण समारंभ साजरे करून संस्कृती जोपासणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या मुलींनी वर्गबंधूंना राख्या बांधल्या मुलांनी देखील भगिनींना छोटीशी भेटवस्तू देऊन रक्षाबंधन सण साजरा केला.वृक्षांना राखी बांधून वृक्ष हे आपले मित्र आहेत हे मूल्य रुजविले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी निमित्त पुस्तक हंडी फोडण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.या उपक्रमामधून पारंपारिक संस्कृती बरोबर आधुनिक संस्कृतीची सांगड घालणे हा मुख्य उद्देश.
बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाची मूर्ती स्थापन करून पाच दिवस गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पठण, गणेशस्तोत्र, गणपतीची गाणी, नाट्यीकरणासह पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट असे विविध कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमापूजन, शिक्षकांचे सत्कार याबरोबरच पाटी दप्तराशिवाय शाळा हा उपक्रम शाळेत राबवण्यात येतो. इयत्ता तिसरी - चौथीचे विद्यार्थी छोट्या मुलांना शिकवण्याचा आनंद लुटतात. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम वर्गावर्गांतून घेण्यात येतात.
दसरा सणानिमित्त सामाजिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरातील लोकांना आमंत्रित केले. तसेच वर्गावर्गांतून सरस्वती पूजन, पाटीपूजन केले जाते.
बाल दिनानिमित्त सर्व वर्गांचा ड्रेस कलर कोड ठरवण्यात आला. तसेच विविध रंगी फुगे आकाशात सोडले. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी ड्रेस कोड प्रमाणे सप्तरंगामध्ये विविध आसने सादर केली तसेच दुसरीच्या विद्यार्थ्यांनी कडधान्यांची पौष्टिक कोशिंबीर बनवली. वर्गावर्गांतून चित्रकला, गाणी, गोष्टी असे विविध उपक्रम राबवले. अशा आनंददायी वातावरणात बालदिन साजरा केला जातो.
एक विषय ठरवून त्यावर आधारित कार्यक्रम बसवले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात स्नेहसंमेलनासाठी निसर्ग ही मध्यवर्ती कल्पना ठरवण्यात आली.
नृत्य , नाट्य,पोवाडा, इतिहास,सामाजिक जागृती यावरील कल्पक , वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि आनंदाची उधळण यात रंगलेले स्नेहसंमेलन हे शाळेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
मकर संक्रांत सणानिमित्त विद्यार्थ्यांनी हलव्याचे दागिने बनविणे, रंगीबेरंगी पतंग बनविणे , भेटकार्ड बनवून व एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांत सण साजरा केला जातो.
रथसप्तमीच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व,आरोग्याच्या दृष्टीने असणारे फायदे सांगितले जातात. तसेच सूर्यनमस्कारामध्ये अंतर्भूत असलेली विविध आसने यांबद्दल सविस्तर माहिती सांगितली जाते. सूर्यनमस्कारासंबंधी श्लोक पाठ करून सूर्यनमस्का नियमित बारा सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला जातो.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात शाळेत साजरे केले जातात. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन केले, तसेच तालबद्ध कवायत प्रकार सादरीकरण, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य स. तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ढोल वाजवून लेझीम प्रात्यक्षिक सादरीकरण , तसेच समूहगीत गायन केले जाते.
शिवजन्मोत्सव देखील शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी विद्यार्थी महाराजांचा पोवाडा, सादरीकरणासह हिरकणीची गोष्ट, गडकिल्ल्यांची माहिती, गाणी इ.चे सादरीकरण केले जाते.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त *मराठी राजभाषा दिन* शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यानिमित्त छोटी नाटुकली, प्रार्थना, शब्दकोडी, बडबड गीते, गोष्टी याचबरोबर विविध कवींच्या कविता बालचमू सादर करतात भाषेची विविध रूपे मुलांना समजावीत हा प्रमुख उद्देश आहे.
विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी शिक्षक व विद्यार्थी मिळून काही नाविण्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण करतात समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी,चमत्कारांमागील विज्ञान विद्यार्थ्यांना समजावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.