
मुख्याध्यापिकांचे मनोगत
प्रिय पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि शिक्षणप्रेमी,
सप्रेम नमस्कार!
“ज्ञानदीप तेवत राहो, संस्कारांचा सुगंध दरवळो,
विद्यार्थ्यांच्या यशाने, भावे शाळेचा गौरव उजळो.”
“विद्या विनयेन शोभते” या उदात्त विचाराचा अखंड दीप तेवत ठेवत, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक परंपरेतील मानाचा तुरा असलेली म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे गेली तब्बल १३० वर्षे ज्ञानदानाचे, संस्कारांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पवित्र कार्य अविरतपणे करीत आहे. काळ बदलला, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या; परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय आणि संस्कारांची श्रीमंती जपण्याची आमची परंपरा आजही तितक्याच अभिमानाने आणि निष्ठेने पुढे चालत आहे.
“शतक ओलांडूनही तेज कमी न झाले,
ज्ञानदानाचे व्रत अखंड सुरूच राहिले.
विद्यार्थ्यांच्या यशकथांनी इतिहास सजला,
भावे शाळेचा मान उंचावला.”
या शाळेतून घडलेले असंख्य विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्या यशामागे या शाळेने दिलेली ज्ञानाची भक्कम पायाभरणी आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
भावे प्राथमिक शाळेला लाभलेला शिक्षकांचा वैभवशाली वारसा ही आमची सर्वात मोठी संपत्ती आहे. स्व. कमलाताई गाडगीळ, स्व. लता सांगळे, स्व. मंगल आपटे आणि स्व. शैलजा लिमये यांसारख्या आदर्श शिक्षिकांनी या विद्यालयाची शैक्षणिक परंपरा समृद्ध केली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळेला दोन वेळा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजही त्याच समर्पणाने, तळमळीने आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून आमचे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत आमची वाटचाल नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेने अनेक विक्रम प्रस्थापित केले असून गुणवत्ता यादीत अग्रक्रम कायम राखला आहे. आजही शाळेच्या व्हरांड्यात झळकणारी गुणवंत विद्यार्थ्यांची नामावली प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारी ठरते.
“यशाचा ध्यास, परिश्रमांची साथ,
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने उजळते प्रत्येक वाट.
गुणवत्तेच्या शिखरावर फडकतो आमचा ध्वज,
भावे शाळेचा अभिमान राहो सदैव सज्ज.”
आमच्या शाळेत शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नसून संस्कार, सर्जनशीलता, नेतृत्वगुण, क्रीडा आणि कलाविकास यांचा सुंदर संगम आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती, नवरात्रोत्सव, क्रीडा महोत्सव, क्रांती सप्ताह, अहिल्याबाई होळकर शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम, परिपाठ, बालसभा, वर्ग मंत्रिमंडळ अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो.
दर वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक विद्यार्थ्याला विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येते, त्यामुळे स्नेहसंमेलन हा केवळ काही निवडक विद्यार्थ्यांचा कार्यक्रम न राहता, प्रत्येक बालकाच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटणे… हाच हेतू…
“खेळ, कला, संस्कार, ज्ञान यांचा सुंदर मेळ घालत ,प्रत्येक बालकाच्या स्वप्नांना , पंखांना नवे बळ देत हसत-खेळत शिकण्याचा आणि शिकवण्याचा आमचा ध्यास आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध बाह्य स्पर्धा व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन शाळेत केले जाते. वक्तृत्व, कथाकथन, गायन, ॲथलेटिक्स, सांघिक खेळ,यांसह विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच महाराष्ट्र ज्ञानपीठाच्या गणित व इंग्रजी परीक्षा, भारती विद्यापीठाची गणित परिचय परीक्षा, ज्ञानांजन, ज्ञानवर्धिनी, एम.टी.एस. मराठी ऑलिंपियाड यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन केले जाते.
आमच्या शाळेचा निसर्गरम्य परिसर हेही आमचे वैशिष्ट्य आहे. प्रशस्त अंगण, ऐतिहासिक दगडी इमारत, हिरवाईने नटलेला स्वच्छ परिसर आणि चैतन्यमय वातावरण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरते. वर्षानुवर्षे घुमणारे स्तोत्रपठण, प्रार्थना आणि विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने हा परिसर सदैव मंगलमय आणि ऊर्जावान वाटतो.
शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन सातत्याने भक्कम पाठबळ देत आहे. शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांचे मार्गदर्शन आणि महामात्रा डॉ. सौ. मानसी भाटे यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच शाळेची यशस्वी वाटचाल अधिक सक्षम होत आहे. या सर्वांविषयी मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
आजच्या डिजिटल युगात शाळेची वेबसाइट ही आमच्या विद्यालयाचा जिवंत आरसा ठरली आहे. शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, यशोगाथा आणि शाळेची समृद्ध परंपरा यांची माहिती जगभरातील माजी विद्यार्थी, पालक आणि समाजापर्यंत पोहोचत आहे. ही ज्ञानसेवेची परंपरा अशाच उत्साहाने आणि नव्या उमेदीने पुढे नेत राहण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.
“हातात ज्ञान, हृदयात संस्कार,
नजरेसमोर उज्ज्वल भविष्याचा विस्तार.
गुणवत्तेचा, संस्कारांचा आणि यशाचा अखंड प्रवास.”
आपल्या सर्वांच्या सहकार्याने, विश्वासाने आणि आशीर्वादाने म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा भविष्यातही ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचा सुंदर संगम घडवत राहील, याची मला खात्री आहे.
आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
– सौ. ललिता दिगंबर कारंडे
मुख्याध्यापिका
म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ, पुणे
