पालखी सोहळा-क्रीडा दिंडी २०२६-२७

म . ए . सो . भावे प्राथमिक शाळेत रंगला पर्यावरण संवर्धन, वारकरी संस्कृती आणि क्रीडेचा प्रेरणादायी सोहळा .

म. ए. सो. भावे प्राथमिक शाळा, पुणे येथे पर्यावरणपूरक क्रीडा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या अभिनव उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ ,महामात्रा डॉ. मानसी भाटे , डॉ. उमेश बिबवे (संचालक, क्रीडा विभाग, म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स) तसेच सौ. जयश्री खलाटे (राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध संतांची, तर काहींनी भारतातील प्रसिद्ध खेळाडूंची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्या वारकऱ्यांनी सादर केलेले लेझीम हे या दिंडीचे विशेष आकर्षण ठरले. टिळक रोड व एस. पी. कॉलेज मार्गे काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी नागरिकांना रोपांचे वाटप करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
यानंतर शाळेच्या सभागृहात पालखी पूजन, अभंग गायन, क्रीडेचे महत्त्व तसेच भारतातील विविध नामांकित खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संतांचे जीवनकार्य, त्यांची शिकवण आणि समाजासाठीचे योगदान याविषयी माहिती देत संतांची शिकवण आचरणात आणण्याचा संदेश दिला. मुलांनी फुगडी, रिंगण याचा आनंद लुटला .विद्यार्थ्यांसोबत पालकही यात सहभागी झाले .पॉम-पॉम कवायत आणि कडी कवायतीच्या मनमोहक सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रमुख पाहुण्यांनीही नियमित व्यायाम, क्रीडा संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे व माननीय उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे कौतुक केले .वारकरी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि क्रीडा संस्कार यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

Scroll to Top