म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेत सामाजिक रक्षाबंधन उपक्रम उत्साहात साजरा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत सामाजिक रक्षाबंधन उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
मेळघाट येथील आदिवासी बांधवांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राखी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक राख्या तयार केल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले. या पर्यावरणपूरक राख्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांना व सेवाभावी व्यक्तींना बांधण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दररोज त्यांना शाळेत आणणे व घरी सुरक्षित पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्हॅनचालक काकांना विद्यार्थिनींनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुणे महानगरपालिका अग्निशामक दलातील जवानांना राखी बांधून त्यांच्या धाडसी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या महत्त्वपूर्ण कार्याला मानवंदना देण्यात आली.
याचबरोबर पुणे विद्यार्थी गृह येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश देण्यात आला. सामाजिक रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.

Scroll to Top