म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच संतुलित आहाराचे महत्त्व समजावे, या उद्देशाने ‘पुस्तक हंडी’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन मा. मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे महत्त्व सांगत श्रीकृष्णाची प्रेरणादायी गोष्ट सांगितली. श्रीकृष्णाच्या गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले तसेच कृष्णाची गाणी गायली.
याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाचे चित्र अतिशय सुंदर व आकर्षक रंगांनी रंगवून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहात ‘पुस्तक हंडी’ फोडून त्यातील गोष्टींची पुस्तके मिळवली. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, हा उद्देश साध्य झाला.
या पुस्तक हंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संतुलित आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, यासाठी हंडीमध्ये कडधान्ये, विविध फळभाज्या व पालेभाज्यांची चित्रे ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आहारात डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या व फळांचा योग्य प्रमाणात समावेश करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. पौष्टिक व संतुलित आहारामुळे शरीराची योग्य वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच अभ्यास व खेळासाठी आवश्यक ऊर्जा मिळते, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
माननीय मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तकांचे वाचन करून आपले ज्ञान वाढवावे तसेच निरोगी राहण्यासाठी संतुलित व पौष्टिक आहार घ्यावा, असा संदेश दिला.
शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.







