म. ए. सो. भावे प्राथमिक शाळेत शिक्षक दिनानिमित्त ‘पाटी-दप्तरा शिवाय शाळा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा . मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे यांच्या हस्ते भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या दिवशी शाळेच्या कामकाजाची संपूर्ण सूत्रे विद्यार्थ्यांनी आपल्या हाती घेतली. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या भूमिका साकारत शाळेचे दैनंदिन कामकाज अनुभवले. दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बालवाडीच्या वर्गात जाऊन छोट्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मोठ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावत लहान मुलांना शिकवण्याचा अनोखा आनंद अनुभवला.
अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पपेट शो, कागदकाम, मातीकाम, चित्रकला व रंगभरण अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे नेहमीच्या पाटी-दप्तराच्या चौकटीबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याची, नेतृत्वाची आणि जबाबदारी घेण्याची संधी मिळाली.
‘पाटी-दप्तरा शिवाय शाळा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सहकार्याची भावना विकसित होण्यास मदत झाली. शिक्षक दिनाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या भूमिकेचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम ठरला.
या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ ,महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुख्याध्यापिका सौ. ललिता कारंडे आणि उपमुख्याध्यापिका सौ. वृषाली ठकार यांनी कौतुक केले.





